मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाद्वारे निवड झालेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं.
मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुमारे एकवीसशे उमेदवार मराठा आरक्षणाची सुविधा घेऊन शासकीय सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार आतापर्यंत शासन सेवेत रुजू झाले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठा समाजासाठीच्या सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणे मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.