नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज गांधीनगर इथं अहमदाबाद मेट्रो योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना बोलत होते. मुंबई अहमदाबाद अंतर पाच तासात कापणा्ऱ्या वंदे भारत या रेल्वेगाडीलाही त्यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोमुळे शहरवासियांचं जीवन सुविधापूर्ण होईल, असं सांगून अहमदाबाद मेट्रोसाठी जमिनीच्या संपादनाचीही गरज भासली नाही, असं त्यांनी नमूद केल. आपली शहरे आधुनिक होत आहेत. आता फक्त कनेक्टिविटी नाही तर शहरांमध्ये स्मार्ट सुविधां निर्माण होत आहेत. वंदे भारत या वेगवान रेल्वे गाडीमुळे मुंबई आणि अहमदाबाद या महत्वाच्या शहरांमधलं अंतर कमी झालं आहे, असं ते म्हणाले.
हवाई प्रवासीसुद्धा आता वंदे भारतने प्रवास करायला प्राधान्य देतील असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. गांधीनगर रेल्वे स्थानक जगातील कोणत्याही विमानतळाएवढंच आधुनिक झालं आहे असंही ते म्हणाले. पुढील वर्षी ऑगस्ट पर्यंत ७५ वंदे भारत गाड्या चालवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. मालगाड्याचा वेग वाढवण्यावर काम सुरु आहे. उत्कृष्ट बंदरे लाभलेल्या गुजरातला त्याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री मोदी कालपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री संध्याकाळी अंबाजी इथं सात हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांच्या योजनांची पायाभरणी तसंच लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रात्री गब्बर तीर्थ इथे होणाऱ्या महाआरतीत ते सहभागी होतील. दरम्यान, काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथं आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवाला भेट दिली आणि तिथल्या संस्कृतिक कार्यक्रम आणि गरबा नृत्याचा आनंद घेतला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.