मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
राज्य शासनाने याविषयी दिनांक 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदाना दिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येईल.
मुंबईमधील खासगी आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत मिळत नसल्यास त्यांना स्वत:चे नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, आस्थापनेचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी, आस्थापना मालकाचे किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी या तपशीलासह तक्रार करता येईल.
प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) येथे तक्रार नोंदविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.