मुंबई : ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद देणारे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आज पासून 12 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय ‘पंढरपूरची वारी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर, कार्यकर्ते आणि कलासंग्राहक रतन लुथ यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, ‘छायाचित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर आपल्याला पंढरपूरच्या वारीतील प्रत्येक क्षण अनुभवता येतो. अशा छायाचित्र प्रदर्शनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाची ओळख सर्वांना होत असते.
कार्यकर्ते आणि कलासंग्राहक रतन लुथ म्हणाले, ‘पंढरपूरच्या वारीतील छायाचित्र काढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील परवानग्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मोलाची मदत मिळाली असून, सामाजिक कार्यकर्ते आणि कलासंग्राहक परवेज दमानिया यांच्या मार्गदर्शनातून जगभरातील प्रसिद्ध छायाचित्रकारांचा सहभाग घेवून हे प्रदर्शन तयार केले आहे.
आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यास जातात. हा प्रवास प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे, शांतनू दास, महेश लोणकर, पुबारून बसू, मुकुंद पारके, सौरभ भाटीकर, डॉ. सावन गांधी, प्रणव देव, राहुल गोडसे, धनेश्वर विद्या, प्रा. नितीन जोशी, दीपक भोसले, शिवम हरमलकर यांनी टिपला आहे.