पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य, उद्योग, लघुउद्योगांचे तसेच लघुउद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोणतेही काम कमीपणाचे नाही हे आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे आवश्यक असून त्यादृष्टीने या कामांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. लोढा म्हणाले, कौशल्य विकासासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका तसेच खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक ‘कौशल्य केंद्र’ सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी विभागाने संबंधित शाळा, संस्थेबाबत सामंजस्य करण्यासाठी प्रयत्न करावेत.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकवण्यात येणारे काही अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून उद्योगांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांची रचना करणे आवश्यक आहे. आयटीआयमधून गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्समध्ये प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्व आयटीआय अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच खासगी क्षेत्राचेही योगदान घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कौशल्य विकास, आयटीआयचे अद्ययावतीकरण आदींमध्ये शासनाबरोबर खासगी क्षेत्र कशा पद्धतीने सहभाग देऊ शकेल याबाबत विचार, कल्पनांचे आदान प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी अशीही सूचना श्री. लोढा यांनी केली. त्यानुसार लघुउद्योग संघटनांनीही पुढाकार घेण्याबाबत सहमती दर्शविली.