नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणा-या विविध कार्यक्रमासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्र तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी नवी दिल्लीत संवाद साधला. कलावतांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग देशाच्या उभारणीच्या कार्यासाठी करावा, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.

महात्मा गांधी यांचे विचार सर्वदूर पोहचले आहेत. महात्मा गांधी हे साधेपणाचे प्रतीक होते. चित्रपट तसंच दूरदर्शन क्षेत्रातील अनेक कलाकांरानी महात्मा गांधी यांच्या तत्वांचा प्रसार करण्याचं काम केलं आहे, असं मोदी म्हणाले. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित चार माहितीपटांचं प्रकाशनही मोदी यांनी केलं.

हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध कलावंत अमिर खान, शाहरुख खान, राजकुमार हिरानी, अनुराग बासु, कंगना राणावत यावेळी उपस्थितीत होते. चित्रपट व्यवसायातील कलाकारांनी दांडी संग्राहालय तसंच सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याशी ममल्लापुरम इथं झालेल्या अनौपचारिक भेटी नंतर ममल्लापुरमची लोकप्रियता वाढवून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनी आपल्याला सांगितल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. भारतीय चित्रपट क्षेत्रातील काम जगाच्या कानाकोप-यात पोहचतं.

२०२२ साली आपण देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत, यानिमित्तानं १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्य लढ्यातल्या स्फूर्तीदायक कथा लोकांसमोर याव्यात तसंच १९४७ ते २०२२ या काळातील देशाची विकास गाथा ही लोकांसमोर यावी अशी विनंतीही त्यांनी केली. देशात वार्षिक आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषद भरवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.