नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि मुलींच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि  सामाजिक परिषदेनं बेदखल केलं आहे. लिंग समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयोगाच्या निर्देंशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

इराण मध्ये शांतता पूर्ण पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर  पोलिसांनी कारवाई केली होती. त्यात एका बावीस वर्षांच्या मुलीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यामुळे अमेरिकेनं इराणला आयोगातून बेदखल करावं, असा प्रस्ताव मांडला होता.

महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या ५४ सदस्यांच्या या संस्थेत २९ सदस्यांनी इराणला बेदखल करण्याच्या बाजूनं मतदान केलं, तर आठ सदस्यांनी याचा विरोध केला आणि १६ सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. आयोगातून प्रथमच कोणा सदस्य देशाला हटवण्यात आलं असून संयुक्त राष्ट्राचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं अमेरिकेच्या राजदूत थॉमस ग्रीन फिल्ड यांनी म्हटलं आहे.