नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे मोबाईल अॅप आणि सीमा सुरक्षा दलाची माहिती पुस्तिका प्रकाशित करताना बोलत होते.

सीमेवर तैनात लष्कराच्या जवानांबरोबरच तिथल्या गावांमध्ये देशभक्त नागरीक कायमस्वरूपी सुरक्षा करू शकतात, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला आहे. सीमा सुरक्षा दलांनी या कार्यक्रमांच्या माध्यमांतून अशा गावांमध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, त्यासाठी ही गावं सर्व सुविधांनी स्वयंपूर्ण करावीत, असं ते म्हणाले.