पुणे : जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. या भेटीच्यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी भारतीय पारंपरिक उत्पादने आणि महाराष्ट्राच्या पर्यंटनस्थळात रुची दाखवली.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य विषयक, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र शासनाचे आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, पुणे महानगर पालिकेच्या मुळा, मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना कुतूहलाने परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. बांबू उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंमध्ये रुची दाखवून आस्थेने माहिती घेतली. तृणधान्य पासून बनवलेली उत्पादने आरोग्यदायी असून ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा असे स्टॉल धारकांना जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
‘जी – २०’ मधील ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी बाजरी तृणधान्यापासून बनवलेल्या चिप्सची चव घेऊन वाहवा केली. ‘नमस्ते महाराष्ट्र’ म्हणत यावेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळे स्वागत करण्यात आले.