नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करण्याला महत्त्व द्यावं आणि स्मार्ट पद्धतीनं हार्ड वर्क करावं. स्वतःला कधीही कमी लेखू नये आणि स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य ओळखून असामान्य कर्तृत्व करून दाखवावं, असा कानमंत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
परीक्षा पे चर्चा या नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडियम वर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आधुनिक तंत्राच्या आणि गॅझेट्सच्या आहारी न जाता त्यांचा वापर आणि आवश्यकता आपण स्वतः ठरवून त्यांचा मर्यादित वापर करावा, आयुष्यात कधीही शॉर्ट कट च्या मागे लागू नये. काम केल्यानं थकवा नाही तर आनंद मिळतो, म्हणून कष्टाला पर्याय नाही. आजूबाजूच्या दबावामुळे कधीही दबून जाऊ नये. वेळेचं उत्तम नियोजन करण्याचं उदाहरण म्हणून आपल्या आईकडे पहा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
खासगी शिकवण्यांनी कॉपी सारख्या अनिष्ट प्रथांचं समर्थन करून त्या प्रकारांना प्रोत्साहन दिलं आहे, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे मेहनती मुलांचं अतोनात नुकसान होतं. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी या अनिष्ट प्रकारांपासून दूर राहावं आणि आपली ऊर्जा सकारात्मक पद्धतीनं वापरून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावं.
पालकांनी त्यांच्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादणं, तुलना करणं, आपल्या सामाजिक स्तराबाबत खूप आग्रही असणं आणि त्यामुळे मुलांना परीक्षेतल्या गुणांच्या बाबतीत ताण देणं टाळायला हवं, असं आवाहन त्यांनी पालकांना केलं.आरोप आणि टीका यांच्यात खूप मोठं अंतर असून आयुष्यात आरोपांची पर्वा करण्याची आणि त्यांना उत्तरे देण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्याची आवश्यकता नसते. मात्र आपल्यावर टीका होत असेल तर त्याचा मात्र खुल्या दिलानं स्वीकार करायला हवा. टीका हेच समृद्ध लोकशाहीचं लक्षण आहे. असं त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना सांगितलं.
देशभरातून आलेले १०० हून जास्त विद्यार्थी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले तसंच दूरस्थ पद्धतीने मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक शिक्षक हा कार्यक्रम ऐकत होते. अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीने आपापले प्रश्न प्रधानमंत्र्यांसमोर मांडले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे देखील या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. देशवासियांना कुटुंबीय मानणारे प्रधानमंत्री देशाला लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर उपस्थितांना सांगितलं.