मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या दिघा गावात सँडोज इंडिया या फार्मा कंपनीच्या नव्या उत्पादन केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती आणि कुशल मनुष्यबळ राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून एक खिडकी योजनेतून उद्योगांसाठी आवश्यक सर्व परवाने देण्यात येतात. यामुळेच गुंतवणुकदार आकर्षित होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्यात उद्योग स्नेही शासन कार्यरत असून जनतेचा आणि उद्योगांचा विकास हेच सरकारचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. आज भूमिपूजन झालेल्या सँडोज इंडियाच्या प्रकल्पात जेनेरिक औषधाची निर्मिती केली जाणार असून यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.