नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची  निर्यात २०२४-२५ पर्यंत ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी बंगळुरू इथं एरो इंडिया २०२३ च उदघाटन करताना बोलत होते. भारत लवकरच संरक्षणविषयक सामुग्रीच्या उत्पादनाचं नव केंद्र बनेल असं ते म्हणाले. ‘कोट्यवधी संधीकडे नेणारी धावपट्टी’ हे ‘एरो इंडिया’ कार्यक्रमाचं  बोधवाक्य असून त्यातून भारताची या क्षेत्रातली उत्तुंग भरारी दिसून येते असं ते म्हणाले. कर्नाटकच्या तरुणांच्या तंत्रज्ञान कौशल्याची त्यांनी प्रशंसा केली आणि देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये हातभार लावण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थीतांसाठी हवाई कसरतीच आयोजन करण्यात आलं होत. एरो इंडिया २०२३ कार्यक्रमानिमित्त एक विशेष टपाल तिकीटही यावेळी प्रधानमंत्र्यांनी जारी केलं. प्रधानमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेत असून एरो  इंडिया कार्यक्रमामुळे संरक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.