नवी दिल्ली(वृत्तसंस्था): न्यूयॉर्क टाईम्स ने काश्मीरमधल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित केलेला लेख खोडसाळ आणि काल्पनिक असल्याची टीका, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली. ठाकूर यांनी असाही आरोप केला की, न्यूयॉर्क टाईम्स मधला लेख भारत, येथील लोकशाही आणि भारताच्या मूल्यांबद्दल अपप्रचार करण्याच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आला होता. आपल्या ट्विट संदेशात ठाकूर यांनी म्हटलं आहे की NYT ने भारताबद्दल माहिती प्रकाशित करताना स्वतःचा तोल सोडला आहे. मंत्री पुढे म्हणाले की, भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य, हे इतर मूलभूत अधिकारां इतकंच पवित्र असून, भारतातील लोकशाही परिपक्व असल्याने कोणत्याही माध्यमांकडून लोकशाहीचे व्याकरण शिकण्याची गरज नसल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. ठाकूर पुढे म्हणाले की न्यूयॉर्क टाईम्स काय पण इतर कोणत्याही परदेशी माध्यमांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा भारता विरुद्ध खोटया बातम्या प्रसारित करण्याचे धोरण, भारत खपवून घेणार नाही.