मुंबई : जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजप्रसाद इनामदार, नरेंद्र पुराणिक व मान्यवर उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील चोरीस गेलेल्या मूर्तींच्या तपासाकामी वेळोवेळी पाठपुरावा करून मूर्तींच्या शोधकार्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल तसेच विशेष प्रयत्नाने चोरीचा तपास जलद गतीने पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संस्थानच्या वतीने कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानच्या वतीनेही यावेळी आभार मानण्यात आले.
हा तमाम पोलिस बंधू, भगिनींचा हृद्य गौरव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हा केवळ माझा नाही, तर माझ्या तमाम पोलिस बंधू, भगिनींचा हृद्य सत्कार आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांब समर्थमध्ये पुन्हा संस्थापित
श्री भूषण स्वामी म्हणाले, जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील शेकडो वर्षापासून चालत आलेली श्री रामोपासना आणि सुर्योपासना आजही अविरतपणे याठिकाणी सुरू आहे. अशा मंदिरातील मूर्ती पुन्हा जांब समर्थ येथे संस्थापित होणे ही महाराष्ट्रातील सर्व भक्ती सांप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भक्तांच्या मनातील हा अभिमान जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य याव्दारे घडले आहे. रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांब समर्थमध्ये पुन्हा संस्थापित झाला असल्याने सर्व श्रीरामभक्त, समर्थभक्त आणि रामदासी सांप्रदायिक परिवार अत्यंत कृतज्ञतापूर्वक ऋणी असल्याचे भूषण स्वामी यांनी सांगितले.