मुंबई (वृत्तसंस्था) : खारघर घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताचा त्रास झालेल्यांपैकी १८ जणांवर अद्याप उपचार सुरू असून २५ जणांना घरी सोडलं असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वार्ताहरांना दिली. अचानक तापमान वाढल्याने उष्माघाताची समस्या निर्माण झाली, या घटनेचं राजकारण करु नये असं आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केलं आहे.

श्री परिवाराचे सदस्य आपले कुटुंबीयच असून या घटनेमुळे आपण व्यथित आहोत अशी प्रतिक्रीया अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. झाला प्रकार दुर्दैवी होता त्यात कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. रेवदंडा इथं अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून घरावरची फुलांची आरास उतरवण्यात आली आहे.

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्यशासनातर्फे मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची तसंच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.