नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३’ या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय पोलाद मंत्रालयाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह, फिक्कीच्या सहकार्याने मुंबईत, गोरेगावच्या प्रदर्शन केंद्रात ही तीन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. पोलाद क्षेत्रातील उद्योग प्रमुख, धोरणकर्ते आणि तज्ञांना एकत्र आणून, या क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडी, आव्हानं तसंच संधी यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत, केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने, पोलाद क्षेत्रासह, संपूर्ण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. गेल्या दशकात, भारतातील पोलाद क्षेत्रात,सहा टक्क्यांपर्यंत स्थिर वृद्धी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक पोलाद संघटनेतील तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात भारत, जागतिक पोलाद वृद्धिच्या केंद्रस्थानी असेल, असंही ते म्हणाले. वर्ष २०२२ मध्ये देशातील तयार पोलाद उत्पादने, ६ टक्क्यांनी वाढली आहेत, मात्र त्याचवेळी जागतिक पोलाद उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश ट्क्क्याची घट झाली, असंही ते म्हणाले. उद्योग आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नाद्वारे सरकार, ‘सुविधा प्रदात्याची’ भूमिका साकारणार असल्याचही सिंधीया यांनी सांगितलं.