नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीतली चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’, अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे नेण्यात उपयोगी ठरेल असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. या बैठकीत, ‘वसुधैव कुटुंबकम’, म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’, या भारतीय तत्त्वज्ञानाला मूर्त रूप प्राप्त झालं आहे असंही त्या म्हणाल्या.
केंद्रीय आयुष आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या बैठकीचं बीजभाषण दिले. या बैठकीला सर्व एससीओ सदस्य देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक, डॉ. टेड्रोस गेब्रेयसस, आणि एससीओ चे महासचिव झांग मिंग, यांच्यासह उच्च स्तरीय भागधारक आणि भागीदार उपस्थित होते. भारताने आपल्या एससीओ अध्यक्षतेखाली, संपूर्ण वर्षभर, विविध चर्चासत्र आणि वाटाघाटींच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. यामध्ये आरोग्य विषयक तज्ञ कार्यगटाची बैठक आणि बैठकींच्या पार्श्वभूमीवरील चार कार्यक्रमांचा समावेश आहे.