मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदूंच्या राज्यातल्या कोणत्याही देवस्थानात भाविकांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान महासंघातर्फे जनजागृती केली जाणार असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश केल्यानं मंदिराचं पावित्र्य भंग होत असल्यामुळे भाविकांनी कोणत्याही देवस्थानांमध्ये दर्शनासाठी जाताना वस्त्र संहिता अर्थात ड्रेस कोड पाळावा असं आवाहन महासंघातर्फे करण्यात आलं आहे. सर्वप्रथम नागपुरातल्या चार प्रमुख मंदिरात ही वस्त्रसंहिता लागू केली जाणार असून त्यानंतर संपूर्ण राज्यातल्या देवस्थानासाठी ती लागू करण्यात येईल असं घनवट म्हणाले. देशभरातल्या अनेक प्रमुख देवस्थानांमधून पूर्वीपासूनच वस्त्र संहिता लागू असून भारताच्या सभ्य संस्कृतीचं दर्शन मंदिरामधूनही व्हावं एवढ्या एकाच उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.