नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाचे आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर किंवा वेंटिंग लिस्टवर नाव असल्यामुळे प्रवास रद्द केल्यानंतर त्या तिकिटाचा परतावा देण्यासाठी नवीन ‘ओटीपी’ आधारीत सेवा सुरू केली आहे. अर्थात ही सुविधा ज्या प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत एजंटांमार्फत ई- तिकीट आरक्षित केले असेल, त्यांनाच मिळू शकणार आहे.
रेल्वे प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानंतर परतावा द्यावा लागतो, या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ही नवीन कार्यप्रणाली लागू करण्यात येणार आहे, असं ‘आयआरसीटीसी’ नं स्पष्ट केलं आहे.
या पद्धतीनुसार ‘ओटीपी’ म्हणजेच ‘वन टाईम पासवर्ड’ तयार करून तो प्रवाशाच्या नोंदवलेल्या मोबाईलवर ‘एसएमएस’व्दारे पाठवण्यात येणार आहे. या पासवर्डच्या मदतीने प्रवाशांना रद्द तिकिटाचे पैसे त्वरित मिळू शकणार आहेत.
रद्द रेल्वे तिकिटाचे पैसे त्वरित मिळावेत यासाठी प्रवाशांनी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:
– आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटला ई-तिकीट काढतानाच योग्य तो मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे.
– त्या एजंटाने प्रवाशाचा मोबाईल नोंदवला आहे की नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे.
– आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांकडूनच ई-तिकीट काढले पाहिजे.
– ज्या प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटांकडूनच ई-तिकीट काढले आहे, त्यांनाच रद्द तिकिटांचा परतावा ओटीपी आधारीत सेवेतून मिळू शकणार आहे.