नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा इशारा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिला. २०१३ ते २०२२ या कालावधीत मानवनिर्मित तापमानवाढीच्या पातळीत शून्य पूर्णांक दोन अंशांची अभूतपूर्व वाढ झाल्याचं त्यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे. या काळात कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाची पातळी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च बिंदूवर, म्हणजेच ५४ बिलियन टन प्रति सेकंदवर गेली असंही त्यांनी सांगितलं. हरितगृह वायूंचं विक्रमी उत्सर्जन आणि वाढत्या हवाप्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग वाढला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही नवी आकडेवारी दुबई इथं या वर्षी होणाऱ्या कॉप २८ हवामान परिषदेत जागतिक नेत्यांसमोर ठेवली जाईल. २०१५ च्या पॅरिस करारातल्या तापमानविषयक ध्येयांच्या पूर्ततेसाठीच्या वाटचालीचा आढावा या परिषदेत घेतला जाणार आहे.