नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) येथे  कॅडेट्सच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.

नियमित अभ्यासक्रमाचे 152 आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 135, यात सात मित्र देशांतील 42 कॅडेट्स मिळून एकूण 374 कॅडेट्सनी(GCs) भारतीय लष्करी अकादमी (IMA) मधून आपले प्रशिक्षण पूर्ण करून ते यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.  यावेळी पासिंग आऊट झालेल्या जेंटलमन कॅडेट्सचे पालक आणि कुटुंबातील सदस्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच आपल्या पाल्यांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी नियुक्ती मिळाल्याच्या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार ठरलेल्या विधिवत पिपिंग समारंभातही त्यांनी सहभागी नोंदवला.

पासिंग आऊट परेड म्हणजे नेतृत्व, स्वयंशिस्त आणि युद्ध कलेचे प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था, आयएमए (IMA) च्या कठोर प्रशिक्षणाचा समारोप आहे. शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी आवश्यक बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक गुणांचा इष्टतम विकास हा आयएमए(IMA) मधील प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. आयएमए(IMA) मधील प्रशिक्षण देशभक्ती, चारित्र्य, गतिमानता, पुढाकार आणि समजूतदारपणा विकसित करते जे भारतीय सैन्यातील नेतृत्वाचा आधार आहे.

यावेळी लष्करप्रमुखांनी परेड कमांडर आणि सहभागी कॅडेट्सचे तसेच जवानांनी आत्मसात केलेले प्रशिक्षण आणि शिस्तीच्या उच्च दर्जाचे संकेत देणार्‍या मनमोहक आणि समन्वयित कवायती हालचालींचे कौतुक केले. लष्कराच्या भावी जवानांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांनी भारतीय लष्करी अकादमी (IMA) मधील प्रशिक्षक आणि कर्मचारी यांचेही कौतुक केले.