नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या जीवनात, आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक समृध्दी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी एका ट्विटमध्ये व्यक्त केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील जनतेला या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू भगवान जगन्नाथांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद, शांतता आणि समृद्धी येवो, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची विधिवत पूजा केली जाते. या विधीमध्ये या देवतांची मिरवणुक काढून देवतांची रथयात्रा काढली जाते. भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ प्रथम तर त्यानंतर भगवान जगन्नाथाचा रथ निघतो. देवतांचे हे भव्य रथ लोक मोठ्या भक्ती भावानं ओढून नेतात. आज दुपारी चार वाजता पुरी इथून या यात्रेला सुरुवात होईल, तर सुमारे तीन किलोमीटर इतकं अंतर पार करून ही यात्रा श्री गुंदीच्या मंदिर इथं समाप्त होईल. या रथ यात्रेसाठी विविध जातीधर्मांचे भाविक तसंच परदेशी पर्यटक देखील आवर्जून उपस्थित असतात.
भगवान जगन्नाथाची १४६ वी रथयात्रा अहमदाबाद शहरात आज प्रदक्षिणा घालणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज सकाळी अहमदाबादमधल्या भगवान जगन्नाथ मंदिरात आरती केली. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यावेळी उपस्थित होते. तब्बल ७२ वर्षांनंतर ८५ लाख रुपये खर्चून तीनही 6 चाकी रथ यावेळी नव्याने तयार करण्यात आले आहेत. रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यात्रा मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.या रथयात्रेत तीस हजार किलो मूग, ५०० किलो जांभूळ, ५०० किलो आंबा आणि ४०० किलो काकडीचं प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे.
जगन्नाथ रथयात्रा ही श्रद्धा आणि भक्तीचा अलौकिक मेळ आहे, दरवर्षी येथे देवाचे दर्शन घेण्याचा अनुभव दैवी आणि अविस्मरणीय असतो, सर्वाना महाप्रभूंचे आशीर्वाद मिळोत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. रथयात्रेला हजेरी लावल्यानंतर अमित शाह अहमदाबादमध्ये विविध विकासात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.