मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त राहण्यासाठी रोज योगा करूया आणि निरोगी राहूया”, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित योगाभ्यासादरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी योगाभ्यासामध्ये सामील झाले होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगभरात योग पोहोचविला. योगदिनाचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला होता. योगाचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) मान्यता दिल्याने जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री हे सध्या न्यूयार्कमध्ये योग करीत आहेत. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी ३५ लाख नागरिक, अधिकारी, कर्मचारी योग करीत आहेत, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे. योग ही आता काळाची, समाजाची चळवळ होत आहे. आपला देश जगाला नवनवीन कार्यक्रम देत असून जी-२० ची थीम ‘वसुदैव कुटुंबकम’ असून संपूर्ण देश हा आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मानतात, याचाही आपल्याला अभिमान आहे. सकाळपासून योग कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन केले आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही योगाभ्यास झाल्याने त्यांनाही नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. योगाभ्यासात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सहभाग घेतला. द योग इन्स्टिट्यूट, सांताक्रूजच्या डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या योगसाधकांनी योगप्रात्यक्षिके केलीत.