मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना केवळ ७३ पूर्णांक ९ दशांश मिलिमीटरच पाऊस झाला असल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. दररोज आकाशात दाटणारे ढग हुलकावणी देत पुढे निघून जात असल्यानं शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. पावसाच्या अभावामुळं पेरणीला विलंब झाला असून कृषी महासंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात केवळ ४६ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आली आहे.