मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीच्या पडताळणीसह विविध कामं करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जातो आहे. या BLO ना सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे. २० ऑगस्टपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
या दरम्यान मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी होईल, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेल्या मतदारांचा शोध घेतला जाईल तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया केली जाईल. नवीन मतदार नोंदणी, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाईल.