मुंबई (वृत्तसंस्था) : हातभट्टीची दारु हे विषारी रसायन या संज्ञेत येते का, याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून पाहिले जातील आणि त्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. अवैध दारु विक्री आणि त्याच्या तस्करीच्या अनुषंगाने गृह आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सदस्य अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टीव्हिटी) कायद्यानुसार अशांविरुद्ध काही ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.  हातभट्टी दारु विक्री आणि त्याची वाहतूक प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याची व्यवहार्यता तपासून पाहिली जाईल, असे त्यांनी सांगितले.