मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता, त्यावर नाना पटोले यांनी उप प्रश्न विचारला होता. काही वर्तमानपत्रं चुकीच्या महितीच्या आधारे निराधार बातम्या छापत आहेत, यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडून त्यांची दिशाभूल होत आहे. त्यामुळं त्या वर्तमानपत्रांवर हक्कभंग दाखल करावा लागेल असं फडणवीस म्हणाले. कोणत्याही खासगी संस्थांकडून नोकर भरती प्रक्रिया सुरू नसून केवळ आयबीपीएस आणि टीसीएस या नामांकित कंपन्या ही प्रक्रिया राबवित आहेत. त्यात कोणताही गोंधळ नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वन विभागाच्या नोकर भरतीत पेपर फुटी झाल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी विधान भवनाच्या प्रांगणात केला.