नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी, रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेला सांगितलं. गेल्या चार वर्षात जगभरात अनेक देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई भासत असून यावर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारविनिमय आणि धोरण तयार करण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. जगभरात कधीच कोणाला उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी शाश्वत  विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे प्रयत्न अधिक जोमानं करायला हवेत, अशी भारताची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.