पिंपरी : पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी सोमवारी (ता. २८) राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी येथील मोरवाडी अजमेरा येथील भूखंड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासंदर्भात गेल्या वर्षी करार झाला आहे. या भूखंडावर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याणासाठी प्रकल्प राबविण्यात येणार असून या बहुउद्देशीय प्रकल्पाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र श्री.खाडे यांनी कामगार कल्याण मंडळाला दिले. यावेळी त्यांनी जागा हस्तांतरणाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती घेतली.

दरम्यान संभाजीनगर मधील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला तसेच जागा हस्तांतरण आणि प्रस्तावित उपक्रमाबाबत विविध सूचना केल्या.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. खोराटे यांनी जागा हस्तांतरणाबाबत माहिती दिली.