मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसींमधल्या गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना म्हटलं आहे. ते आज जळगाव इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाल्याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडनविस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. या लाठीमाराबद्दल फडनवीस यांनी माफी मागितली, म्हणजे लाठीमाराचे आदेश त्यांनीच दिले होते, याची ही एक प्रकारे कबुलीच आहे, असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांबाबत वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडावी, अन्यथा असे आरोप करु नयेत, असंही पवार म्हणाले. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, पाऊस नसल्यानं स्थिती चिंताजनक आहे, त्यात लोड शेडींगची समस्या आहेच. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आशा निर्माण झाली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाहीय, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवी तशी आवश्यक बाजारपेठ उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नाही, अशी टीका पवार यांनी केली.