नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी २६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. तसंच बस्तरमध्ये नागरनार इथल्या एनएमडीसीच्या ग्रीनफिल्ड पोलाद प्रकल्पाचं त्यांनी लोकार्पण केलं. जवळजवळ २४ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये उच्च गुणवत्तेचं पोलाद उत्पादन होईल. या प्रकल्पामुळे हजारो जणांना रोजगार मिळेल.
आपल्या जगदलपूर भेटीत प्रधानमंत्र्यांनी जगदलपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली तसंच अंतागड आणि तारोकी दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग आणि जगदलपूर आणि दंतेवाडा दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाचं लोकार्पण केलं. तारोकी आणि रायपूर दरम्यानच्या रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवली. या प्रकल्पांमुळे या आदिवासी भागातला रेल्वे संपर्क सुधारेल आणि या भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५ वर कुंकुरी आणि छत्तीसगड-झारखंड सीमेदरम्यान बांधलेल्या नवीन मार्गाचं देखील प्रधानमंत्री मोदी यांनी आज लोकार्पण केलं.