पुणे : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय,विधान भवन, पुणे येथे सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त संजय माने यांनी कळविले आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिला लोकशाही दिनाच्या दिवशी महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, अडचणी यावर संबंधित विभागाचे अहवाल, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका यांचा विचार करुन लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत माहिती देण्यात येते. महिलांनी आपली तक्रार नोंदवण्यासाठी विहित नमुन्यात दोन प्रतीत अर्ज करणे आवश्यक आहे. तक्रार अथवा निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. महिला लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक व आस्थापनाविषयक बाबी तसेच विहित नमुन्यात नसणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
महिलांनी तक्रार, निवेदन अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बालविकास, पोलीस आयुक्तालय शेजारी, ३ चर्च रोड, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठवावीत असेही श्री. माने यांनी कळविले आहे.