नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीत केला. पक्षाचे ९९ टक्के कार्यकर्ते यांच्या शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा केल्याचं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीनंतर वार्ताहरांना सांगितलं. काही चुकीची, बनावट आणि अपुरी कागदपत्रं सादर करुन पक्षात वाद असल्याचा दावा अजित पवार गटानं केला आहे. पक्षाची घटना त्यांना पाळायची नाही, आमदार आणि खासदारांच्या समर्थनाच्या आधारावर पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर केलेला दावा शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेला नसल्याचं सिंघवी यांनी आयोगाला सांगितलं. अजित पवार गटासोबत असलेल्या आमदार-खासदारांना मिळालेली मतं ग्राह्य धरुन निर्णय द्यावा हा दावा आश्चर्यकारक असल्याचं सिंघवी म्हणाले. याप्रकरणी पुढची सुनावणी सोमवारी होणार असून यावेळी अजित पवार गटाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. आयोगासमोर आज झालेल्या सुनावणीत शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला, असा दावा अजित पवार गटानं केला.