नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटिस बजावली. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास आयोगानं सरकारला सांगितलं आहे. केंद्र आणि राज्यांमधल्या सरकारच्या काही कल्याणकारी योजना आणि त्यांचं यश अधोरेखित करणाऱ्या काही जाहिराती निवडणूक नसलेल्या राज्यांच्या सरकारनं निवडणूक होणार असलेल्या राज्यांमधल्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध केल्याचं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलं असल्याचं या नोटिसमध्ये म्हटलं आहे. भविष्यात, आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात याव्यात, असे निर्देशही आयोगानं दिले आहेत. भाजपानं या प्रकरणाची तक्रार आयोगाकडे केली होती.