नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी आपलं सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं ते संवाद साधत होते. विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाल्याला आज एक महिना पूर्ण झाला असून या अवधीत देशवासियांनी या यात्रेचं उत्साहाने स्वागत केलं आणि विविध योजनांची माहिती घेतली, तसंच आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली. देशाच्या कानाकोपऱ्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम झाला. ठिकठिकाणी लाभार्थी आणि लोकप्रतिनिधी प्रधानमंत्र्यांच्या संवादाच्या वेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांनी आज प्राधान्याने शहरी भागातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. सरकारच्या विविध योजनांमुळे शहरांमधे उपलब्ध झालेल्या सुविधांची त्यांनी माहिती दिली. मुंबईत मालाड इथं आयोजित कार्यक्रमात कांदिवलीच्या मेघना गुरव यांनी मुद्रा योजना, शिक्षण कर्ज आणि पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगितलं. शिक्षणासाठी मिळालेल्या कर्जामुळं मुलाला परदेशात शिकायला पाठवणं शक्य झाल्याची भावना त्यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली. देशातल्या महिला स्वावलंबी होऊन इतरांनाही प्रगतीसाठी सहाय्य करत आहेत हेच केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजनांचं यश असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे,तसंच केंद्रीय विधी आणि न्याय राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी सांगितलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या खेमजई इथून बोलत होते. खासदार हंसराज अहिर, आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर मधे वाडगाव कोल्हाटी इथं केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या चिखली इथं झालेल्या कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. बुलडाणा इथं केंद्रीय रोजगार आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव या कार्यक्रमाला उपस्थित होते.