मुंबई (वृत्तसंस्था) : घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असूनही सत्तास्थापनेच्या दिशेनं हालचाली न झाल्यानं राजकीय अस्थिरता दिवसभर कायम होती. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आणि आपल्याला राज्यपालांनी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितल्याचं पत्रकारांसमोर जाहीर केलं.
मुख्यमंत्री म्हणाले की राज्यपाल सांगतील तोपर्यंत मी पदावर राहीन, मात्र अशा अवस्थेत धोरणात्मक निर्णय घ्यायला मर्यादा पडतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आपल्यात मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत कोणतंही बोलणं झालं नाही, भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात तसं बोलणं झालं असेल, तर त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत, असं ते म्हणाले.
शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आमचे सर्व पर्याय खुले आहेत, असं विधान केलं, याचं आश्चर्य वाटलं, असं ते म्हणाले. आम्ही मात्रं महायुतीचच सरकार बनेल, असं सांगितलं होतं, याची त्यांनी आठवण करुन दिली. ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्यांच्याशी शिवसेनेनं चर्चा केली, मात्र आमच्याशी केली नाही, असंही ते म्हणाले.
शिवसेनेकडे त्यांच्या दाव्यानुसार १७० जागा असतील, तर त्यांनी जरूर सत्ता स्थापन करावी. भाजपातर्फे महायुतीची दारं शिवसेनेसाठी अजूनही बंद झालेली नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.