नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 57 सदस्यीय मंत्रिमंडळास शपथ दिली. यात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी नितीन गडकरी यांना भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.
पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालय आणि उद्योग व वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण, वने व हवामान बदल तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. अरविंद सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या तीन राज्यमंत्र्यांचेही खातेवाटप झाले आहे. रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा तसेच रामदास आठवले यांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा व संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार
प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला यावेळी श्री. जावडेकर म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. या खात्याचा मंत्री म्हणून प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करेन. तसेच आज पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.