भोसरी : मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्रमांक 1/207 सफारी पार्क यासह 12 मीटर व 18 मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी मागितली आहे. राज्य सरकारकडे याबाबतची मागणी केली आहे. महसूल व वन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सरकारकडे विचाराधीन आहे. सफारी पार्कची जागा पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ही जागा पुणे महापालिकेला देऊ नये अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याला कडाडून विरोध केला आहे. जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी 9 जून रोजी गावबंद ठेवण्यात येणार आहे.