मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प, यासह एकूण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून, लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी सुरू होती.
भविष्यात शासनानं किंवा न्यायालयानं आदेश दिला तर चौकशी पुन्हा सुरू केली जाईल, असं याबाबत जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. या सर्व नऊ प्रकरणांचा २०१३ च्या सिंचन घोटाळ्याशी संबंध नसल्याचा खुलासाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केला आहे. चौकशी बंद करण्याच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षानं टीका केली आहे.
भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं पाठिशी घालणं, हाच भाजपचा सत्यनिष्ठेचा मार्ग असल्याची उपरोधिक टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट संदेशातून केली आहे, मात्र ही प्रकरणं पुराव्याअभावी बंद केली असून, त्या प्रकरणांशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.