पुणे : वस्तु व सेवा खरेदीमध्ये वेगवेगळया जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. फसवणुक होऊ नये यासाठी वस्तु खरेदी करतांना ग्राहकाला जागृत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जागो ग्राहक जागो या मोहिमेंतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अशासकीय सदस्य यांचा जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे आदी उपस्थित हेाते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 अनुसार जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण, रेरा तसेच अन्न सुरक्षा कायदा, भेसळीबाबत किंवा वस्तुंचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या प्रयोगशाळांची माहिती व कार्य, थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या कामकाज व त्यांच्या विरुध्द येणाऱ्या तक्रारींचे निराकरण याबाबतची माहिती तसेच वस्तु व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व त्याचे निराकरण, ग्राहकांचे विविध हक्क व त्यांच्या तक्रारीचे निवारण व उपाय.
कृषि क्षेत्रातील शासनाच्या विविध योजना, अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळया विभागाचे अधिकारी यांचेही वस्तू व सेवा विक्रेत्यांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यास तो जिल्हास्तरावर तक्रार दाखल करु शकतो व त्याविषयीचा पाठपुरावाही करु शकतो. ग्राहक म्हणून आपण किती जागृत आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी मानले. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य उपस्थित होते.