मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य विधानसभेतला विश्वासदर्शक आज १६९ विरुद्ध शुन्य मतांनी जिंकला. तर चार सदस्य तटस्थ राहीले. भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाह्य पद्धतीनं सुरु असल्याचं म्हणत सभात्याग केला.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, तसंच गटनेते जयंत पाटील, शिवसेना नेते सुनिल प्रभू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. प्रस्तावावर आधी आवाजी मतदान झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन, प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मत देणाऱ्यांची प्रत्यक्ष मोजणी केली. त्याआधी आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घातला. हे अधिवेशन नियमाला धरून बोलावलेलं नाही, अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज आहे असा आक्षेप भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मात्र राज्यपालांनी समन्स काढल्यानंतर सात दिवसांच्या आत अधिवेशन बोलावलं असल्यानं, ते नियमानुसारच आहे असं म्हणत, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचा आक्षेप फेटाळून लावला. यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ, संविधानानुसार विहीत नमुन्याप्रमाणे नव्हती, त्यामुळे ती ग्राह्य धरता येत नाही असा आरोपही केला, आधीच्या हंगामी अध्यक्षांच्या जागी, दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून झालेली निवड नियमबाह्य आहे, सत्ताधाऱ्यांना गुप्त मतदानाची भिती वाटत असल्यानंच अशा रितीनं नियमबाह्य पद्धतीनं निवड झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र वळसे पाटील यांनी हा मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, त्यानुसारच राज्यपालांनी आपली अध्यक्ष म्हणून केलेल्या निवडीला मान्यता दिल्याचं सभागृहात स्पष्ट केलं. शपधविधीची घटना सभागृहाबाहेरची आहे, असं स्पष्ट करून त्यांनी त्याबाबतचा मुद्दाही फेटाळून लावला.