पिंपरी : ‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण येथे उदघाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हर्मनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष दिनेश पालिवाल यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि देशासाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी आहे. मोदी सरकारच्या दुसर्या पर्वातील ही पहिली मोठी खाजगी गुंतवणूक आहे. यामुळे इन्फोटेनमेंट, टेलेमॅटिक्स, नेव्हीगेशन, सायबर सिक्युरिटी इत्यादी क्षेत्रांना मोठी चालना मिळेल.
महाराष्ट्र हे देशाचे ऑटोहब आहे. आज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने गुंतवणूकदार येत आहेत आणि तेच खरे आमचे ब्रँड अॅम्बॅसेडर्स आहेत. आमच्या उद्योगपुरक धोरणांमुळे, इतर सोयी-सुविधांमुळे, चांगल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे आम्ही रोजगारनिर्मितीमध्ये सुद्धा अग्रेसर आहोत. गुंतवणूकदारांना अधिकाधिक संधी मिळत असताना आम्ही केवळ सरकार म्हणून नाही, तर त्यांच्या यशातील एक भागिदार म्हणून काम करतो आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतो आहोत. त्यांच्या यशासोबतच महाराष्ट्र सुद्धा उत्तुंग भरारी निरनिराळ्या क्षेत्रात घेत आहे.