जनतेच्या आशा–आकांक्षा पूर्ण करणार
नागपूर : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्तमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) डॉ.नितीन राऊत, आमदार अशोक चव्हाण, दिवाकर रावते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर मध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो आहे. राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरु होत आहे. राज्यातल्या माता-भगिनींच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद हे आमचं पाठबळ असून त्या शक्तीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.
अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार असून त्यांच्या प्रश्नांना कृतीतून उत्तरे देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशन, नागपूर-2019
प्रस्तावित विधेयकांची यादी
प्रस्तावित विधेयके |
(1) महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत महाराष्ट्र (समाजाला उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ वुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (इनाम जमिनींवरल गुंठेवारी नियमाधीन करताना आकारण्यात येणारी नजराण्याची व द्रव्यदंडाची रक्कम कमी करण्याबाबत) (अध्यादेश क्रमांक 16/2019 चे रूपांतर)
(2) महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2019 (ग्राम विकास विभाग) (अधिनियमातील अनर्हतेबाबतच्या तरतुदी नगर पंचायतीच्या सदस्यांना देखील लागू होण्याकरिता सुधारणा) (अध्यादेश क्रमांक 17/2019 चे रूपांतर)
(3) महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (पीठासीन अधिकाऱ्यांची पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्ये चार महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता देण्याची तरतूद) (अध्यादेश क्रमांक 21/2019 चे रूपांतर)
(4) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे.) (ग्राम विकास विभाग) (अध्यादेश क्रमांक 22/2019 चे रूपांतर)
(5) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (गौण खनिजे बेकायदेशीर पणे काढल्यास व त्यांची वाहतूक करण्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री व साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार सर्व महसुली अधिकाऱ्यांना प्रदान करणे ) (अध्यादेश क्रमांक 24/2019 चे रूपांतर)
(6) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2019
(7) महाराष्ट्रमहानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2019 (महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रणाली पुन्हा चालू करणे) (नगरविकास विभाग)
(8) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्र. – महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१९