मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत असे प्रयत्न आहेत. यासाठी महापालिकेने ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने रस्ते पुनर्रचनेसाठी एक स्पर्धा घेतली. त्यातून पाच रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले. या आराखड्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.
‘मुंबई स्ट्रिट लॅब” या स्पर्धेत रस्त्यांची संरचना-संकल्पनेशी निगडीत संरचनाकार-विशारदांनी सहभाग घेतला. यात 52 संस्थांनी सहभाग नोंदविला. त्यातून 15 संघांची निवड करण्यात आली. या संघाना शहरातील पाच रस्त्यांच्या पुनर्रचनेसाठी संकल्पना सादर करण्याचे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम देण्यात आले. या स्पर्धेतून हे रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले. यात केवळ पाच रस्त्यांवरील सुमारे सत्तर हजार चौरस फूट जागा कोणतेही मोठे फेरबदल न करता मोकळे करण्यात यश आल्याची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली.
स्पर्धेत यशस्वी संस्था आणि संबंधित रस्ते पुढीलप्रमाणे – विक्रोळी पार्कसाईट रोड क्र. 17 – बांद्रा कलेक्टीव्ह रिसर्च अँड डिझाईन फाऊंडेशन, मौलाना शौकत अली रोड – मेड(ई) ईन मुंबई, ई नेपीयन सी रोड – स्टुडिओ पोमग्रेनेट, राजाराम मोहन रॉय रोड – स्टुडिओ इनफिल अॅन्ड डिझाईनशाला कोल्याबरोटिव्ही, एस.व्ही.रोड – प्रसन्न देसाई आर्किटेक्टस. अशाच रितीने मुंबईतील सुमारे दोन हजार किलोमीटर्सचे रस्ते पादचाऱ्यांसाठी सुसह्य आणि सहज चालण्यासाठी मोकळे करण्यात येणार आहेत. यामुळे मोटार वाहतूकही सुरळीत होईल अशा गोष्टींचा समावेश असणार आहे. यात पदपथ खुले करणे, त्यांची रूंदी वाढविणे, दुभाजकांची आणि जोड रस्त्यांसह व्यापारी पेठांतील रस्त्यांची ठेवण सौंदर्यीकरण, यासह बस थांबे, रस्ते यांच्या रचनेत बदल ते सुविधापूर्ण व्हावेत अशा संकल्पना आहेत.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.