पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच मतदाराच्या घरी पोहचा. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले पाहिजेत त्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विभागवार बैठकांना गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. या बैठकांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून सुरवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लोकांसारखी चिकाटी हवी, त्यांच्याकडून जनसंपर्क कसं करायचं ते शिका, असा सल्ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन् एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. संपर्कात कसं राहावं हे आरएसएस शिकवतं असं मला एका खासदाराने सांगितले, असे शरद पवार यांनी पदाधिकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.