पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे.

पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महामेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

मेट्रोचे दोन संच नागपूरहुन मागील रविवारी (दि. 22) पुण्याकडे रवाना झाले होते. तब्बल आठ दिवसांच्या प्रवासानंतर हे कोच काल रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. तीन डब्यांची एक मेट्रो असणार असून पहिल्या मेट्रोचे तीन कोच शहरात दाखल झाले आहेत. त्यानुसार आजपासून लगेच मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात झाली आहे. अवजड क्रेनच्या सहाय्याने डबे रुळावर टाकले जात आहे.