जर्मनीच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, जर्मनीचे मुंबई येथील वाणिज्यदूत डॉ. जुरगन मोरहर्ड उपस्थित होते. दोन्ही देशातील सांस्कृतिक, वाणिज्यिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढावी याबाबत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची तरुण तडफदार आणि कुशल प्रशासक म्हणून जागतिक प्रतिमा असल्याचे गौरवोद्गार जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी या भेटीदरम्यान काढले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे. महाराष्ट्रात या दिशेने भरीव कामगिरी होत असल्याचे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

पुणे येथे व्यवसाय उभारणीसाठी जर्मन उद्योजकांनी विशेष पसंती दर्शविलेली आहे. सुमारे 300 हून अधिक जर्मन कंपन्यांचे उत्पादन केंद्र पुणे जिल्ह्यात आहे तसेच, पुणे येथील जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्रालाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्यासंबंधी या भेटीत चर्चा करण्यात आली.