मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबविली जाते. श्रेणीनिहाय अ श्रेणीसाठी रुपये 3150 रुपये ब श्रेणीसाठी 2700 रुपये तर क श्रेणीसाठी 2250 रुपये मानधन अदा करण्यात येते.

या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आलेली असून समिती प्रती जिल्हा 100 कलाकारांची निवड करते. सध्या मानधन घेत असलेल्या कलावंतांनी त्यांचे हयातीचे दाखले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे सादर करावेत. दाखले सादर न करणाऱ्या कलावंतांचे मानधन माहे एप्रिल 2019 पासून रोखण्यात येईल.

तसेच ज्या कलावंतांना मानधन मंजूर आहे, पण काही कारणास्तव त्यांचे मानधन थांबले आहे, अशा कलाकारांनी कार्यालयाकडे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02222842670 किंवा 0222842634 कार्यालयाचा ई-मेल mahaculture@gmail.com/dcamandhan@gmail.com या योजनेअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात कलावंतांची निवड करावयाची आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जिल्हानिहाय कलावंतांचे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक 31 जानेवारी 2020 आहे.

कलावंतांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे तसेच बृहन्मुंबई व उपनगरातील कलावंतांनी त्यांचे अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32, या ठिकाणी सादर करावेत. 31 जानेवारीनंतर प्राप्त होणारे कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.