नागझिऱ्यातील पक्षीनिसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन‘ एक्सप्रेसवर

मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांमुळे विदर्भातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

श्री. पटोले यांनी आज डेक्कन क्वीन एक्सप्रेसला भेट देऊन एमटीडीसीच्या या उपक्रमाची पाहणी केली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गजानन जोशी, जी. पी. मीना आदी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, एमटीडीसीच्या अशा उपक्रमातून विदर्भासह राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. राज्यातील आणि देशातील इतर रेल्वे एक्सप्रेसवरही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यटनाचा विकास झाला की त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. यापुढील काळात विदर्भात नवीन रोजगार निर्मिती करणे, शेतकरी आत्महत्या थांबविणे यासाठी तेथील पर्यटन विकासावर भर देण्यात येईल. विदर्भातील वन्य पर्यटन, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आदींना चालना देण्यासाठी राज्य शासनाला सूचना देऊ, असे श्री. पटोले यांनी सांगितले.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, डेक्कन क्वीन रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात आली आहेत. महाराष्ट्रात एमटीडीसीची विविध ठिकाणी 23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा येथे महामंडळाचे अत्याधुनिक सोयी – सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय आहे. सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे.

अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांचा वावर असतो. परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृश्य असते. आता या परिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यटकांना नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.