नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेच्या पुढील महिन्यात होणा-या निवडणूक प्रक्रियेत ११ विधानसभा मतदारसंघांमधे बूथ ‍अँपचा वापर करण्यात येणार आहे, असं दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

या मतदार संघांतल्या मतदारांना छायाचित्र असलेली मतदार चिठ्ठी देण्यात येईल, आणि मतदान केंद्रावर या चिठ्ठीवरील क्यूआर कोड स्कॅन करुन ओळख पटवण्यात येईल, आणि मगच मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.

दिल्लीत एकूण एक कोटी ४७ लाख मतदार असून, त्यातील ८० लाख ५५ हजार पुरुष, तर ६६ लाखाहून अधिक महिला मतदार आहेत. १३ हजार ७५० मतदान केंद्र या निवडणुकीसाठी उभारण्यात येणार असून, येत्या ८ फेब्रुवारीला दिल्लीच्या ७०विधानसभा सदस्य संख्येसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी ११ फेब्रुवारीला होईल.